Friday, October 7, 2011

ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र?

Esakal
http://www.esakal.com/esakal/20111007/5255712661125493679.htm


"ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र?
कामिल पारखे
Friday, October 07, 2011 AT 08:15 PM (IST)

नुकतेच ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाले आणि मी उत्सुकतेने ती बातमी वाचली. हिंदी साहित्यिक अमर कांत आणि श्रीलाल शुक्‍ला यांची सन 2009 साठी तर 2010 साठी कन्नड साहित्यिक डॉ. चंद्रशेखर कंबार यांची या पुरस्कारांसाठी निवड झाली. ती बातमी मी शेवटपर्यंत वाचली आणि माझे मन विषण्णतेने भरून गेले. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे डॉ. कंबार हे कन्नड भाषेतील आठवे साहित्यिक आहेत, असे त्या बातमीत म्हटले होते.

ज्ञानपीठाची 1960च्या दशकात स्थापना झाल्यापासून, गेल्या पाच दशकांत हा पुरस्कार भारतीय भाषांतील एक महत्त्वाचे मानदंड बनला आहे. ज्ञानपीठ हे भारतीय साहित्यजगतातील सर्वांत अधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार. साहित्य अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांहून अधिक महत्त्व ज्ञानपीठास आहे. काही लाख रुपयांचे बक्षीस आणि सरस्वतीदेवीची मूर्ती ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यास दिली जाते. ज्ञानपीठ सन्मान मिळवणाऱ्या जवळजवळ प्रत्येक साहित्यिकाने त्यापूर्वी साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळवलेले असतेच.

ही बातमी वाचून विषण्ण होण्याचे कारण म्हणजे, ज्ञानपीठाच्या पाच दशकांच्या इतिहासात आतापर्यंत मराठीला हा प्रतिष्ठेचा सन्मान केवळ तीन वेळाच लाभला आहे. मराठी साहित्यात अनेक उच्च दर्जाच्या कांदबऱ्या आणि कथासंग्रह लिहिणाऱ्या वि. स. खांडेकरांना हा पुरस्कार त्यांच्या आयुष्याच्या अगदी अखेरीस देण्यात आला. दृष्टी अधू झालेली आणि वयोमानानुसार अनेक व्याधींनी शरीर थकलेले असताना त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा सन्मान काही वर्षे आधीच दिला गेला असता तर त्याचा आनंद उपभोगता आला असता, असे ते त्यावेळी म्हटल्याचे स्मरते. त्यानंतर तब्बल दीड दशकांनंतर कवी आणि नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ 'कुसुमाग्रज' यांना हा सन्मान लाभला. काही वर्षांपूर्वी कवी विंदा करंदीकरांनाही ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कन्नड आणि हिंदी भाषांतील साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार सर्वाधिक म्हणजे आठ वेळा देण्यात आला आहे. भारतीय साहित्यजगतात मराठी साहित्यविश्‍व अत्यंत समृद्ध समजले जाते. गेली अनेक दशके दरवर्षी नियमाने प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक, त्यानिमित्त होणारी काही कोटी रुपयांची उलाढाल, दरवर्षी होणारी आणि अनेक अर्थांनी गाजणारी भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि संपूर्ण वर्षभर कुठे ना कुठे होणारी वेगवेगळी प्रादेशिक, सांप्रदायिक, ज्ञातीय आणि इतर साहित्य संमेलने, यांमुळे मराठी साहित्य जगात प्रचंड घुसळण होत असते, साहित्यनिर्मिती होते आणि त्याचा आस्वादही घेतला जातो. भारताच्या इतर कुठल्याही भाषांत साहित्याविषयी इतके प्रेम वा कार्यक्रम होत असतील, असे वाटत नाही. असे असूनही आतापर्यत केवळ तीनच मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा, याबद्दल मला आश्‍चर्य वाटते.

डॉ. कंबार यांच्यापूर्वी डॉ. के. एस. कारंथ आणि डॉ. गिरिश कर्नाड वगैरे कन्नड लेखकांना ज्ञानपीठ सन्मान मिळालेला आहे. त्यापैकी डॉ. कर्नाड यांचे तुघलक आणि हयवदन आदी साहित्यिक कलाकृतींची मराठी भाषांतरे मी वाचलीही आहे. काही ज्येष्ठ मराठी साहित्यिकांनी लिहिलेले साहित्य, हे हिंदी किंवा कन्नड भाषांतील वा इतर कुठल्याही भाषांतील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्याच्या तुलनेत खुजे आहे, असे म्हणता येणार नाही. तरीही मराठी भाषेला आतापर्यंत केवळ तीनच ज्ञानपीठ पुरस्कार का मिळावीत? पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याने मराठी वाचकांच्या मनांवर अनेक वर्षे राज्य केले. मात्र पुलंचा ज्ञानपीठासाठी कधी विचार झाला नाही. जी. ए. कुलकर्णी, गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे, नारायण सुर्वे वगैरे मराठी लेखकांचे साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार मिळण्याच्या लायकीचे नाही, असे कुणी म्हणेल काय? मराठी दलित साहित्याने केवळ साहित्य क्षेत्रातच नव्हे, तर महाराष्ट्रातील समाजजीवनात मोठी क्रांती केली. अशा दलित साहित्यिकांपैकी नामदेव ढसाळ, दया पवार आदींपैकी एकाचेही साहित्य ज्ञानपीठ देण्याच्या लायकीचे नव्हते काय? का असे पुरस्कार मिळवण्यासाठी पडद्यामागे ज्या काही हालचाली कराव्या लागतात, त्यात मराठी माणूस मागे पडतो?

No comments:

Post a Comment