Saturday, July 21, 2012

बिशप डिसोझा यांची 'फेसबुक'वरून जगभर प्रवचने


बिशप डिसोझा यांची 'फेसबुक'वरून जगभर प्रवचने
Tuesday, July 17, 2012 AT 01:15 AM (IST)
बिशप डिसोझांचा 79व्या वर्षी उपक्रम 

कामिल पारखे 
पुणे- ख्रिश्‍चन समाजाच्या पुणे धर्मप्रांताचे निवृत्त बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांनी वयाच्या 79व्या वर्षी "फेसबुक'च्या माध्यमातून प्रवचने देण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या उपक्रमाला अल्पावधीतच चांगलाच प्रतिसाद मिळत असून, जगभरातून सुमारे अठराशे मित्र जोडले गेले आहेत.

डिसोझा यांनी 126 वर्षांच्या पुणे धर्मप्रांताच्या इतिहासात तब्बल 31 वर्षे बिशपपद भूषविले. या कालावधीत त्यांनी शेकडो मोठी प्रवचने देऊन भक्तांना प्रभू येशूचा मार्ग दाखविला. प्रवचन देताना स्वतःच गिटार वाजवीत गाणी म्हणण्याची सवय असल्याने त्यांना "सिंगिंग बिशप' म्हणून ओळखले जात असे. अशा या उत्साही धर्मगुरूंनी मार्च 2010 मध्ये सुरू केलेल्या फेसबुक अकाउंटला सर्वाधिक प्रतिसाद तरुणवर्गाकडून मिळत आहे.

यासंदर्भात ते म्हणाले, ""मी आतापर्यंत 1,775 मित्र फेसबुकमार्फत जोडले असून, दररोज त्यात सरासरी दहा जणांची भर पडत आहे.'' सोमवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली तेव्हाही ते लॅपटॉप घेऊनच बसले होते. प्रवचन पोस्ट करण्याबरोबरच परिचितांना लग्न आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही ते नियमित पाठवीत असतात.

पुणे धर्मप्रांताचे बिशप असताना डिसोझा यांना देशात आणि युरोपात अनेक ठिकाणी धार्मिक प्रवचन देण्यासाठी मोठी मागणी असे. त्यांच्या प्रवचनांचे तीन खंड प्रसिद्ध झाले आहेत. गुड फ्रायडे आणि ईस्टरदरम्यान एका स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून त्यांच्या प्रवचनांचे प्रक्षेपण अगदी अलीकडील काळापर्यंत करण्यात येत होते.

No comments:

Post a Comment